पुस्तक परिचय
१ भारतीय कुटुंब संस्था
' एक व्यक्ती म्हणून मी पूर्णपणे स्वतंत्र आहे . आणि म्हणूनच मला स्वैराचार करण्याचा ( वेश्या म्हणून जगण्याचा ) पूर्ण अधिकार आहे . ' काही दिवसांपूर्वी मी बायकोचे हे वाक्य ऐकले आणि खरोखर मनापासून सांगतो मला आता जीव द्यावासा वाटतो आहे . जीवनात आता जगण्यासारखे काहीही राहिलेले नाही या ठाम विचाराकडे मी आता आलेलो आहे .
अमेरिकेतील व्यक्ती आपल्या भारतीय मित्राला सांगत होती . पुरुष घोरतो म्हणून घटस्फोट घेणारी स्त्री व स्त्रीचे नाक नकटे म्हणून विघटीत होणारा पुरुष . नकळत्या वयात कुमारी माता बनलेल्या बरातेरा वर्षांच्या मुली आणि कालपरवा पर्यंत एकमेकांसोबत नाचणारी बागडणारी आज क्षणार्धात गोळीबाराचा पाऊस पडणारी ओठावरची लवही न विरलेली कोवळे बालके . कोठे आणून पोहोचवलेय अमेरिकी समाजाने आपल्या देशाला !
भारतीय मित्र त्याला म्हणाला, ' तुला काय वाटते अमेरिकी माणूस विचार करीत नाही ? जगातील ४० टक्के साधनसंपत्ती वापरणारा, विश्वातील सर्वश्रेष्ठ जे ते आपल्याकडे पाहिजे म्हणून सदैव धडपडणारा, ते मिळविण्यासाठी अथक परिश्रम करणारा, ज्यांनी अमेरिकेला जगात अग्रभागी आणून उभे केलेय ते, तो अमेरिकी याची चिंता करत नाही का ?
तुला ठाऊक आहे का ! पर्यावरणाची चिंता करणारी २५ % अमेरिकी माणसे आज दहनसंस्कार करतात . ३३% माणसे भारतीय अध्यात्म परंपरेचा अवलंब करताना दिसतात . योग , ध्यान , शाकाहार त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे . आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या संगोपनाकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागले आहेत . सहकुटुंब , सहपरिवार फिरायला लागले आहेत . ' मित्राने बोलणे संपविले .
' भारतीय कुटुंब संस्था ' हे मा . कृष्णप्पाजींचे पुस्तक वाचले . मन अंतर्मुख झाले . भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला . आर्थिक स्थितीत बदल होत मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्ग बनला . समाजातील स्तर आर्थिक दृष्टीने एक पायरी वर सरकले . पैसा आला आणि येताना बरोबर कुरीतींच्या छायाही घेऊन आला . पशुता , लुबाडणूक , बलात्कार , क्रूरता , विघटन , स्वार्थ समाजाला ग्रासू पाहू लागला .
समाजातील या समस्यांवर विचार करताना , छोटे छोटे उपाय करताना मा . कृष्णाप्पाजींना जो मार्ग दिसला , जी दिशा गवसली तिचे दिशादिग्दर्शन करणारे हे त्यांचे पुस्तक आहे . मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून भरपूर पोकेट मनी देणे आणि तो व्यसनी झाल्यावर गळा काढणे , मुलगी शिकावी म्हणून स्वयंपाकाला हात लावू न देणे आणि लग्न झाल्यावर चहाही करता न आल्यावर डोक्याला हात लावून बसणे , अति लाडाने शेफारून ठेवणे आणि घटस्फोट झाल्यावर विमनस्क होणे , अपघातात माणूस जाणे आणि कुटुंबाची वाताहत होणे . किती समस्या सांगाव्या !
समाजाच्या विद्यमान स्थितीवर टीका सगळेच जण करतात . ती बदलण्याचा मार्ग मात्र कोणीच दाखवत नाहीत अशी स्थिती आज आहे . भारतीय कुटुंब संस्था ' या पुस्तकात मा . कृष्णप्पाजींनी मात्र असे आश्वासक समाज स्वरूप दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे . कुटुंब हा आपल्या समाजाचा अभेद्य किल्ला आहे . संस्कार हे त्याचे मजबूत शिलाखंड आहेत . आणि परस्परांमधले ममत्व हे त्यातील सिमेंट आहे .
मुले हि आपली खरी संपत्ती आहे . त्यांना भरपूर वेळ द्या . दिवसातून एकदा एकत्र जेवा . मुलांना आपले आपल्या हाताने वाढा . नातेवाईकांना भारतीय नावांनी हाक मारा . गृहोपयोगी वस्तू कमीत कमी वापरा . शक्य तोवर काटकसर करा . पाहते लवकर उठा . देवावर श्रद्धा ठेवा . भरपूर दानधर्म करा . अतिथी आपला देव आहे . भितींवर चांगली देवतांची चित्रे लावा . स्वभाषा , स्वदेशी व स्वभूषा हे सूत्र पाळा .
श्री . भाऊराव क्षीरसागर अनुवादित या पुस्तकाला मा . सुरेश सदाशिव उपाख्य भय्याजी जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे . भारतीय विचार साधनाने प्रकाशित केकेल्या या १०४ पानी पुस्तकाची किंमत १०० रुपये आहे . सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः संघटक लोकांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे . आपल्या कार्यक्रमात यातील उपक्रमांची जोड दिली पाहिजे . भारतीय कुटुंबासाठी तर हि आधुनिक गीता ठरावी . साखरपुडा , विवाह , विवाह वर्धापनदिन , वाढदिवस या दिवशी सप्रेम भेट द्यावे असे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे .
लेखक :- मा . कृष्णाप्पा
प्रकाशक :- भारतीय विचार साधना, पुणे
किंमत :- १०० रुपये
पृष्ठ :- १०४
कौतुक बाळे ,
kautukbale.blogspot.com
गोवादूत - २२-२-२०१५
छत्रपती शिवाजी आणि स्वराज्य
आपल्या देवभूमी भारताच्या इतिहासाचे वर्णन इतिहासालाही अज्ञात असे सार्थ करण्यात येते . इतिहासाचा हा भारतीय प्रवाह शतकानुशतके अक्षुण्ण असलेला आपल्याला दिसतो . आपल्या पराक्रमी पूर्वजांनी त्यासाठी दिलेले योगदान, केलेले अथक प्रयत्न याचाच हा परिणाम होय . या महापुरुषांच्या मांदियाळीतील अलीकडचे नरश्रेष्ठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज .
भारतावर सतत सहाशे वर्षे मुघल आक्रमण झाले . टोळीयुद्धात वाकबगार, कसलाही विधिनिषेध नसलेला, केवळ सुखोपभोगात रममाण होणारा समाज सत्ताधारी बनला . त्यांना न पर्वा या देशाची ना चिंता या संस्कृतीची . या मुघल आक्रमणाने आपल्या गावात सुखनैव निवास करणारा भारतीय समाज भ्रमित झाला . धर्म म्हणजे कर्तव्याच्या कसोटीवर पारखिली जाणारी त्याची जीवनशैली हिंदकळली . या वादळात दीपस्तंभासारखे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज .
छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर राजे , धुरंधर राजकारणी पुरुष . पहिल्या क्रमांकाचे युद्ध कसे लढावे हे जगाला शिकविणारा हा रणनितीज्ञ राजा, राज्यकारभार कसा करावा हे तेवढ्याच ताकदीने सांगे . प्रामाणिकपणा, शील, सद्गुणसंपन्नता, निःस्वार्थ ध्येयनिष्ठा, साहस, कौशल्य, धैर्य, सावधानपणा या गुणांची निर्मिती समाजामध्ये करी . स्वभाषा शुद्धी, नाणी पाडणे, मंत्री परिषदेची स्थापना, जहाज बांधणी, छपाई तंत्राची उत्सुकता, शस्त्रास्त्र निर्मिती, रस्ते बांधणी छत्रपतींनी काय नाही केले ? गडरचना, हेर विभाग, महिला सन्मान, कृषी, कुटुंब, पाणी, वेतन, न्याय, धर्म सगळ्यांनाच आपला परिसस्पर्श देतांना त्यांना इतिहासाने पहिले .
महाराज ३०० गडांचे स्वामी होते . पण एकही गडावर त्यांचा नातेवाईक किल्लेदार नव्हता . राजा मृत्यू पावताच पळून जाणारा समाज म्हणूनच त्यांच्या बरोबर स्वराज्यासाठी लढायला उभा राहिला . परिणामी जगातील सर्वात क्रूर धर्मांध औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर राजा नसलेल्या जनतेने त्याला २५ वर्षे झुंजवून झुंजवून तिथेच गाडून टाकलेले आपण पाहतो. संघटीत समरस समाजाचे हे अनोखे उदाहरण आहे .
अशा या शिवाजी राजांचे ' गवर्नन्स ' दाखविणाऱ्या त्यांच्याच २२ पत्राचे उत्कृष्ठ संपादन लेखक खासदार श्री . अनिल दवे यांनी केले आहे . छत्रपती म्हटले कि आम्ही आमच्या सोयीनुसार त्यांची युद्ध वर्णने करतो . आणि आपला सत्तर टक्के वेळ त्यांनी स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी घालविला याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो . त्यांनी छापील पुस्तक प्रती पहिल्या आणि असे यंत्र आणण्याचा ते विचार करू लागले असा उल्लेख लेखकाने या पुस्तकात केला आहे .
शासन व्यवस्थेवर टीका सगळेच जण करतात . ती बदलण्याचा मार्ग मात्र कोणीच दाखवत नाहीत . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोधातून असे आश्वासक सुशासक स्वरूप दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे . पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे साप्ताहिक विवेकाने प्रकाशित केकेल्या संपूर्ण रंगीत अशा या २३१ पानी पुस्तकाची किंमत ५०० असून सध्या ते ४०० रुपये सवलतीत उपलब्ध आहे . सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः राजकारणी लोकांनी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे . सप्रेम भेट द्यावे असे वजनदार, सुंदर रंगीत छायाचित्रे आणि सुंदर बांधणी असलेले हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे .
लेखक :- श्री . अनिल दवे
प्रकाशक :- साप्ताहिक विवेक
किंमत :- ५०० रुपये
सवलत मूल्य :- ४०० रुपये
कौतुक बाळे ,
kautukbale.blogspot.com
' आमेन द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन ' नावाचे सिस्टर जेस्मी यांनी लिहिलेले आत्मचरित्र . त्याचा सुनंदा अमरापूरकर केलेला मराठी अनुवाद वाचला . १६० पानांचे, १८० रुपये किमतीचे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे .
नन म्हणून उण्यापुऱ्या तेहेतीस वर्षांच्या अनुभवाचे गाठोडे . कोन्व्हेण्टच्या दगडी दाराआडचे श्वास, निश्वास . सद्सदविवेक बुद्धीच्या कसोटी दगडावरचे टाके टवके . सत्याचे सोयीस्कररित्या होत असलेले असत्य परिवर्तन . आणि कडेलोट म्हणजे कटपूर्वक मनोरुग्ण ठरवून टाकण्याचे अघोरी कारस्थान . संवेदनशील मनाला न पटते तर नवलच .
आपण फिरणारा पंखा बघतो . सुलट दिशेने फिरणारा पंखा उलट दिशेनेही तेवढ्याच वेगाने फिरताना भासमान होतो . संघटनांचेही तसेच असते काय ? सर्वांना संघटीत करण्याचा मंत्र जपत असताना आतमध्ये मात्र प्रत्यक्षात प्रचंड वेगाने त्या लोकांना विघटीत करीत असतात काय ? आणि मग म्हणूनच एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्यांच्या मध्ये पराकोटीचा विद्वेष, घृणा का दिसते ? कालपर्यंत ज्या माणसाबरोबर हसलो खेळलो, नेमके त्याच्यावरच आज संघटीत क्रूर गिधाडी वार का करतो ? कळत नकळत घडलेली छोटीशी चूक मीठ मसाला लावून सांगता सांगता मुद्दाम घडवून चक्क खोट्या गोष्टी कशा काय पसरविल्या जातात ? ध्येयासाठी समर्पित पैशांच्याच आधारे ध्येयवेड्यांचे खच्चीकरण ?
खेकडी वृत्तीचे उदाहरण देता देता स्वतः आपण पाय खेचणारे खेकडेच का बनतो ? चार माणसे एकाच दिशेने तेव्हा जातात जेव्हा पाचवा माणूस त्यांच्या खांद्यावर असतो हे उदाहरण देत देत एकेका माणसाला पोहोचवत पोहोचवत ते संघटनेलाच तिरडीवर का नेतात ? इतिहासातील बलाढ्य संघटनांचा रऱ्हास अशाच प्रकारे झाला असेल काय ?
गोव्यातील स्वयंसेवकांनी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे .