Thursday, 4 June 2015

गोमंतक

कौतुक काशिनाथ बाळे, आशियाना, कोंब, मडगांव, गोवा. ४०३६०१
भ्रमण ९८५०४५३८७६ दूरभाष ०८३२२७१००२३
ईमेल kautukbale@ymail.com
दि. ०३-०६-२०११

संपादक दै. गोमंतक

'  वाचकांचा पत्रव्यवहार  ' या सदरात प्रकाशित करण्यासाठी पत्र पाठवीत आहे. यथायोग्य प्रसिद्धी द्यावी अशी विनंती.

आपला,
कौतुक बाळे

  रायगडावर शिवपुण्यतिथी साजरी   
 गार्डने हिरवा सिग्नल दिला आणि दिवा पसेंजर हलली. आमच्या सगळ्यांच्या तोंडून एकच  गर्जना
 बाहेर पडली. ' छत्रपती शिवाजी महाराज कि जय '  ' भारतमाता कि जय ' दिवा आपल्या गतीने जात होती.  
 आमची मने मात्र गरुडाचे पंख लाऊन कधीच रायगडावर जाऊन पोहोचली होती. त्या मुघली आक्रमणाने
त्रस्त शिवकालाचा, नेत्यावरून जीव ओवाळून टाकणाऱ्या त्या शूर मराठ्यांचा, बेलाग तटांनी सजलेल्या गडाचा,
बहुतांश लढाया जिंकलेल्या रायांचा, उद्या होणार असलेल्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचा विचार ती करीत
होती. गोव्याचे एकूण आम्ही तीस तरुण मावळे    रायगडला निघालो होतो. यंदा ३३१ वी शिवपुण्यतिथी
रायगडावर साजरी करण्यासाठी. मर्दानी गाणी म्हणत,छोटे छोटे बैठे खेळ खेळत, गाडीत येणारे खाद्यपदार्थ खात, थट्टामस्करी करीत  मजेत प्रवास कसा पूर्ण झाला कळलेच नाही.          
         संध्याकाळ जवळ आली. सव्वासहा च्या सुमारास आम्ही रायगड चढायला सुरवात केली. शिवछत्रपतींचे
स्मरण करीत, मावळ्यांचा जोश मनात आणीत, जोरदार घोषणा देत आम्ही गड चढत होतो. चढता चढता
कुणाची तरी ओठी कविता आली. ' छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ' गीत म्हणताना चढण कधी
संपली काही कळलेच नाही.रायगड दिसला आणि मन भरून आले. शून्यातून स्वराज्य निर्माण करीत या
किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. आम्हाला आमचे सिंहासन राजांनी दिले. कृतज्ञतेने त्या मातीला
हात लावून टिळा केला.
       गडावर पोहोचताच समजले कि आत्ताच ' रायगड स्वच्छता  मोहीम ' संपली होती. दरवर्षी दुपारी दोन ते
सात हि मोहीम राबविली जाते. रायगड हे आता पर्यटन स्थळ  बनले आहे. रोप वे चीही सुविधाही निर्माण
झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे येतात. पण या पवित्र स्थानावर जे पवित्य्र बाळगायला पाहिजे ते
न बाळगीत कचरा टाकून ते जात असतात. यासाठी समाज प्रबोधनासाठी हि मोहीम राबवितात. आम्हाला
त्यात भाग घ्यायला मिळाला नाही याची रुखरुख लागून राहिली.
        रात्री ' हि रात्र शाहिरांची ' हा पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. दोन महिलाही या कार्यक्रमात सहभागी
झाल्या होत्या. नंतर शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोल्हापूरच्या   उत्तरेश्वर मर्दानी 
आखाडा  या  व्यायाम  मन्डलाने नेत्रदीपक शस्त्र कसरती सादर केल्या. दांडपट्ट्याने एक हजार एकशे अकरा लिंबे
कापण्याचा विक्रम करण्यात आला.  एका मंडळाने बारा तास दंड फिरविण्याचा संकल्प केला होता. शिवरायांच्या आधुनिक मावळ्यांनी  तो पूर्ण केला. जगदीश्वर मंदिरात कीर्तन संपन्न झाले. बरीच रात्र झाली होती. पहाटे उठायचेही होते. शिवस्मरणात कधी झोपेने घेरले कळलेच नाही.
            भल्या पहाटे जाग आली. प्रातर्विधी आटोपले. आता रायगड दर्शन. गडाची माहिती देणार होते प्रख्यात 
इतिहास तद्न्य श्री. निनाद बेडेकर व दुर्ग तद्न्य श्री. प्र. के. घाणेकर. आपल्या अमोघ वाणीने त्यांनी इतिहास
 जिवंत केला. गडा  विषयीची  तपशीलवार माहिती त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली.  ते बोलत होते आणि अडीच
 तास आम्ही शिवकाळात वावरत होतो. आठ वाजता श्री. शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात आली.
            नऊ वाजता राजदरबाराचा प्रमुख कार्यक्रम सुरु झाला. सगळा रायगड भगव्या फेत्त्यानी रंगून गेला होता. 
 अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र  राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. सुनीलजी तटकरे होते. या कार्यक्रमात इतिहासकार
 श्री. निनाद बेडेकर यांना दुसरा  ' श्री शिवपुण्यस्मृती  रायगड पुरस्कार '  प्रदान करण्यात आला. त्यानंतर
 पालखी मिरवणूक निघाली. पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. आरती झाली. आणि महाप्रसादाने
कार्यक्रमाची सांगता झाली. १८९५ साली लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली होती. आता महाडची स्थानिक उत्सव समिती हा उत्सव साजरा  करते. इतिहासाविषयी मोठ्या
गप्पा आपण मारतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वर्णन करताना म्हणतात, ' शिवाजी छाप विड्या ओढणे
 एवढाच आपला व शिवाजी यांचा संबंध '  . असो !
           रायगड हा मूळ रायरीचा किल्ला. सह्याद्रीच्या ऐन कुशीत वसलेल्या या गडाचे  लष्करी महत्व राजांनी
 ओळखले आणि राजधानी म्हणून त्याचा विकास केला. केवळ वाऱ्यानेच चढावे व पावसानेच उतरावे असे 
 या गडाचे दुर्गमत्व. राजांच्या राज्यारोहणाला हेन्री ओग्झीडेन नावाचा ब्रिटीश मुत्सद्दी उपस्थित होता.
रायगडावर राजांची स्वारी अंबारीत बसली होती. एवढा मोठा हत्ती वर रायगडावर आकाशातून आला कि
भुयारातून याचा तोंडात बोटे घालून तो दिवसभर विचार करीत होता असे सांगतात.
           शिवाजी राजे हे संघटन कुशल होते. त्यांनी कष्टकरी माणसांतून सैनिक उभे केले. अत्यंत निष्ठावान
मावळे. देश  हा देव असे माझा असे मानणारे मावळे. तळहातावर शीर घेऊन लढणारे मावळे. माणसाचे
 महानता त्याच्या मृत्युनंतर लक्षात येते असे म्हणतात. राजांच्या मृत्युनंतर पाच लाखांची क्रूर सेना घेऊन, सगळे अनुकूल  असलेला धर्मांध औरंगजेब लढाईसाठी दक्षिणेत उतरला. राजाच  नसलेल्या दीड लाख
मराठी सेनेने प्रतिकूल परिस्थितीत, हा लढा पंचवीस वर्षे चालविला. औरंगजेबाला दक्षिणेतच गाडला.
संगठनशीलतेचे हे परमोच्च उदाहरण आहे. राजाधीराजांना परम आदराने वंदन करताना मनात येते !

तव शौर्याचा  जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे
तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे |
त्या दिप्तीतून दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत 
पुन्हा लिहाया अमुचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत || 

No comments:

Post a Comment